Saturday, 27 December 2025

रोज सकाळी भेटणारा महान शास्त्रज्ञ : लुई पाश्चर

रोज सकाळी भेटणारा महान शास्त्रज्ञ : लुई पाश्चर


हा महान शास्त्रज्ञ रोज सकाळी तुमच्या-आमच्या भेटीला येतो.

कुठे म्हणून काय विचारता?

सकाळी घरात येणाऱ्या दुधाच्या पिशवीवर छापलेला एक शब्द पाहा— “पाश्चराइज्ड”.

हा शब्द ज्याच्या नावावरून आला, तो शास्त्रज्ञ म्हणजे लुई पाश्चर.


लुई पाश्चर यांच्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया.


दूध, ताक, वाइन यांसारखे नाशवंत पदार्थ जर तापवले नाहीत, तर काही तासांतच ते नासतात. कारण त्यामध्ये सूक्ष्म जंतू वेगाने वाढतात. दूध सुमारे ६० अंश सेल्सिअसपर्यंत तापवून लगेच थंड केल्यास हे जंतू निष्क्रिय होतात आणि दूध लगेच नासत नाही. म्हणूनच गावागावांतील गोठ्यांतून ३६ ते ४८ तासांपूर्वी काढलेले दूध आपल्या घरापर्यंत पोहोचते, तरी ते ताजेच राहते.


दूध नासण्यामागे जंतू कारणीभूत असतात, हा सिद्धांत प्रथम लुई पाश्चर यांनी मांडला आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग दाखवून दिला. त्यांच्या सन्मानार्थ या प्रक्रियेला पाश्चरायझेशन असे नाव देण्यात आले.


आंबणे, फसफसणे, नासणे ही केवळ रासायनिक क्रिया नसून ती जैविक प्रक्रिया आहे आणि तिच्यामागे विशिष्ट जंतू असतात, हे पाश्चरने ठामपणे सिद्ध केले. या प्रक्रियेसाठी त्यानेच फरमेंटेशन हा शब्द रूढ केला. ज्या प्रक्रियेत उपयुक्त पदार्थ तयार होतात ती फरमेंटेशन, तर जिथे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ती प्युट्रीफिकेशन.


विशेष म्हणजे, पाश्चरने संशोधन सुरू केले तेव्हा या शोधांचा वैद्यकशास्त्राशी संबंध असेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. तो मूळचा रसायनशास्त्रज्ञ होता. केवळ औत्सुक्यापोटी त्याने जीवशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि पुढे तोच त्याचा आयुष्याचा ध्यास बनला.


१८६४ साली फ्रान्सची वाइन इंडस्ट्री अचानक अडचणीत आली. तयार झालेली वाइन आंबट होऊन व्हिनेगरमध्ये रूपांतरित होऊ लागली. हा देशासाठी मोठा आर्थिक फटका होता. सरकारने पाश्चरला पाचारण केले. पाश्चरने वाइन खराब करणारे जंतू शोधले आणि उपायही सुचवला. वाइन ४२ अंश सेल्सिअसपर्यंत गरम केल्यास जंतू नष्ट होतात आणि वाइनचा दर्जा टिकून राहतो, हे त्याने दाखवून दिले. हाच उपाय पुढे दुधासाठी वापरला गेला.


यानंतर रेशीम उद्योगावर संकट कोसळले. रेशीम अळ्यांवर संसर्गजन्य रोग पसरला होता. अळ्या मरू लागल्या, कोश नष्ट झाले आणि उत्पादन थांबले. पाश्चरने या रोगामागे एक प्रोटोझोआ असल्याचे शोधले आणि त्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे रेशीम उद्योग वाचला. पुढे त्याने कोंबड्यांमधील चिकन कॉलरावरही यशस्वी उपाय शोधला.


या सगळ्या संशोधनाचा कळस म्हणजे लसीकरणाचा शोध. आज ‘लस’ हा शब्द आपल्यासाठी सामान्य आहे, पण त्या काळी या संकल्पनेचे अस्तित्वच नव्हते. पाश्चरने अँथ्रॅक्सवर प्रयोग करताना एक क्रांतिकारी गोष्ट शोधली— मृत जंतू शरीराला जिवंत जंतूंविरुद्ध लढायला शिकवतात. हाच लसीकरणाचा पाया होता.


यानंतरचा त्याचा सर्वात महान शोध म्हणजे रेबीजवरील लस. रेबीजचे जंतू त्याला प्रत्यक्ष दिसत नव्हते, कारण ते तंत्रज्ञानच उपलब्ध नव्हते. पण निरीक्षण, प्रयोग आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने लस तयार केली. ९ वर्षांचा जोसेफ मिस्टर हा पाश्चरच्या लसीमुळे रेबीजमधून वाचलेला जगातील पहिला रुग्ण ठरला. त्या घटनेनंतर संपूर्ण जगाचे लक्ष पाश्चरकडे वेधले गेले.


आयुष्याच्या उत्तरार्धात पाश्चरला लकवा झाला, तरीही त्याची संशोधनाची जिद्द थांबली नाही. १८८८ साली त्याच्या स्मरणार्थ इन्स्टिट्यूट पाश्चर या संस्थेची स्थापना करण्यात आली.


पाश्चरचे कर्तृत्व मोजण्यासाठी शब्द अपुरे पडतात. आजची मायक्रोबायोलॉजी, लसीकरण, जंतुसिद्धांत— या साऱ्या आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पाया रचणारा माणूस म्हणजे लुई पाश्चर.


रोज सकाळी दुधाची पिशवी हातात घेताना

एक क्षण थांबा…

त्या पिशवीवर छापलेल्या शब्दामागे उभा असलेला

हा महान शास्त्रज्ञ आठवा.


लुई पाश्चरला मनापासून सलाम.

No comments:

Post a Comment